अखिल भारतीय विद्यार्थी परिषद किनवट शाखेतर्फे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे किनवट येथील उपकेंद्रात विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन निवेदन दिले.
किनवट : येथील कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रात विविध शैक्षणिक समस्यांना घेऊन अभाविप किनवट शाखेतर्फे निवेदन देण्यात आले. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक समस्या भेडसावत होत्या. वारंवार प्रभारी समन्वयकांचे यासंदर्भात लक्ष वेधले असता त्यांनी टाळाटाळ केली व विद्यार्थांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
अनेक समस्यांना ग्रस्त विद्यार्थी उपकेंद्राच्या या हलगर्जीपणामुळे हतबल झाले होते. प्रभारी समन्वयकांच्या या व्यवहाराला विद्यार्थी कंटाळले होते. विद्यार्थांना तिथे ग्रंथालय उपलब्ध नाही, उपकेंद्रात संगणक कक्ष उपलब्ध असूनदेखील ते धूळखात जमा आहे, दररोज साफसफाई होत नाही व उपकेंद्रात घाणीचे साम्राज्य झाले आहे, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्यात यावे, फोटोकॉपीचे शुल्क कमी करण्यात यावे, फिल्डवर्क व ओरिएंटेशन विजिट सुरळीतपणे पार पडावे, विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाच्या शासकीय निर्णयाचे त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी, विद्यापीठाच्या निवडणुका घेण्यात याव्या या सर्व समस्यांना घेऊन अभाविप शाखेतर्फे निवेदन देण्यासाठी उपकेंद्रात गेले असता तिथे प्रभारी समन्वयक व सह-समन्वयक दोघेही गैरहजर होते.
त्यामुळे अभाविपने तिथे शिक्षण विभागात निवेदन देऊन एका आठवड्याच्या आत जर सर्व समस्या सोडविण्यात आल्या नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी शहर मंत्री रामचंद्रसिंह जाधव, सहमंत्री साईदत्त पाचपुते, सहमंत्री शिवम गेडाम, श्रीनिवास चिलावार, ओमकार कुरसंगे, जिल्हा संघटनमंत्री श्रीनिवास उईके व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.